हर्र बोला हर्र च्या जयघोषात श्री सिध्देश्वर यात्रेस प्रारंभ

उद्या रविवारी अक्षता सोहळा होणार

सोलापूर √ हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जय जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास शनिवार दि. 13 जानेवारीपासून यण्णीमजन विधीने प्रारंभ झाला यामुळे सोलापुरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले आहे .सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा सोहळा म्हणजे भक्तगणांसाठी अलौकिक अनोखी पर्वणीच असते यात्रा सोहळ्याला महाराष्ट्र, कर्नाटक,तेलंगणा आणि आंध्रातील लाखो भक्तगणांची उपस्थिती असते यावर्षी यात्रा सोहळा
दि. 13 ते 17 जानेवारी दरम्यान संपन्न होणार असून या पाच दिवसांमध्ये पारंपरिक रूढी, परंपरेसह सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत.
शनिवार दि. 13 जानेवारी रोजी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यात सकाळी सहा वाजल्यापासूनच भक्तगणांनी मोठी उपस्थिती लावली होती. श्री सिद्धेश्वर पूजास्थान आणि पालखी तसेच मानाच्या पहिल्या आणि दुसर्‍या नंदीध्वजांचे दर्शन घेऊन नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी झाली होती. हिरेहब्बू वाड्यासह संपूर्ण परिसर भक्तगणांनी फुलून गेला होता यात्रा सोहळ्यानिमित्त अनोखा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. सकाळी साडेआठ वाजता यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी, आ.विजयकुमार देशमुख, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख,डॉ. किरण देशमुख तसेच सर्व मानकरी यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे, सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, श्री सिद्धेश्वर यात्रा मध्यवर्ती समितीचे सभापती महादेव चाकोते, निवडणूक समितीचे प्रमुख ऍड. मिलिंद थोबडे यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसेच भक्तगणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.विधिवत पूजन आणि आरती झाल्यानंतर अत्यंत उत्साहात 68 लिंगांना तैलाभिषेक मिरवणुकीला प्रारंभ झाला यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडासह मिरवणुकीत सहभागी झाले. मानकरी योगीनाथ शिवशेट्टी यांच्यासह विजयकुमार शेट्टी, धर्मराज शेट्टी, समर्थ शिवशेट्टी, हे भक्तगणांकसून 68 लिंगाच्या तैलाभिषेकासाठी तेल स्वीकारून त्यांनी सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली.

हर्र बोला हर्र सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करत श्री सिद्धेश्वर मंदिराकडे मानाचे सातही नंदीध्वज मंगलमय वातावरणात मार्गस्थ झाले. यावेळी पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता तसेच सोमपा प्रशासन देखील सज्ज होते पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त विजय कबाडेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मानाच्या सातही नंदीध्वजांचे दर्शन घेता येत असल्याचा आगळावेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

मिरवणुकीच्या अग्रभागी पंचरंगी ध्वज डौलाने फडकत होता हलग्यांचा प्रचंड कडकडाट, बैल जोडी बग्गी, मेरी आवाज सुनो, न्यू हळदे बँड, राजकमल बँड चा मंजुळ नाद त्यावरील सुमधुर भावगीत भक्तिगीत भगवा ध्वज नव्या स्वरूपात बनवण्यात आलेली श्री सिद्धरामेश्वरांची पालखी मागे मानाचे सातही नंदीध्वजाचे अलौकिक रूपडं भारावून सोडणार होते सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी ही धोत्रीच्या 22 सेवेकर्‍यांनी शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची पालखी घेत तसंच पंचाचार्य ध्वज घेत आपली सेवा अर्पण केली. संपूर्ण मार्गावर पांढऱ्या बाराबंदी वेशातील नंदीध्वज धारक शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा अखंड जयघोषात ठीक ठिकाणी स्वागतासाठी आणि दर्शनासाठी उभारलेले बालक आबालवृद्ध भक्तगणांनी नयनरम्य रंगावली अत्यंत वेगळा असा आणि विलक्षण असाच अनुभव भक्तगणांनी यानिमित्ताने घेतला तैलाभिषेक करून सर्व नंदीध्वजांचे शनिवारी रात्री आकरा वाजता हिरेहब्बू वाड्यात आगमन झाले.

🟫🟫🟫🟫
शनिवारपासून मंगलमय वातावरणात यात्रेस प्रारंभ झाला रूढी परंपरेनुसार यात्रेतील सर्व धार्मिक विधी पार पडतील. तैलाभिषेक ( यण्णीमजन ) पहिल्या दिवशी सातही नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्थान होतात जिल्हा परिषद जवळ आल्यानंतर हिरेहब्बू यांना देशमुख यांच्याकडून सरकारी आहेर केला जातो नंतर ही मिरवणूक सिद्धरामेश्वर यांच्या मंदिर मध्ये गेल्यानंतर तिथे अमृतलिंगा जवळ आल्यानंतर अमृत लिंगाला तैलभिषेक केला जातो 68 लिंगापैकी सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये
असलेल्या लिंगांना तैलाभिषेक करून सोलापुर शहरातील 68 लिंगाना प्रदक्षिणा घातली जाते.
🟫प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू

समाजकारणामध्ये धर्म आणि जात आणू नये हिच शिकवण श्री सिद्धरामेश्वरांनी बाराव्या शतकात आपल्याला सांगितलेले आहे सिद्धेश्वर तलावाची जी संकल्पना होती त्यात सर्व जाती धर्माला घेऊन तलावाची निर्मिती केली होती समाजात हाच संदेश इथून पुढे घेऊन जाण्याची गरज आहे 🟫 माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *