ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळा भक्तिभावाने संपन्न…

एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ च्या जयघोषाने दुमदुमला आसमंत !

सोलापूर √ एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ चा जयघोष… दुपारी 1.46 वाजता सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला…! ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी विवाह सोहळा रविवारी भक्तीभावाने पार पडला रंगीबेरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमती कट्टा येथे भक्तिमय वातावरणात उत्साहाने जमलेल्या लाखों भाविकांनी ” याची देही याची डोळा ” हा सोहळा पाहिला.सुमारे 900 वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यात भाविकांची हजारो संख्येने उपस्थिती होती.

रविवारी सकाळी श्री मल्लिकार्जून मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर योगदंड व पालखी श्री सिद्धरामेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली परंपरेनुसार जागोजागी भक्तांकडून नंदीध्वजाची पारंपारिक पध्दतीने लिंबू खोबरे खारीकपुजा केली जात होती तसेच ठिकठिकाणी बाशिंग बांधले जात होते
हिरेहब्बू यांच्या घरापासून निघालेली पालखीसह नंदीध्वज पारंपरिक मार्गाने सवाद्य मिरवणुकीने संमती कट्ट्यावर पालखी व योगदंड पोहचले. नंदीध्वजांच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांचे चेहरे दुपारी 1 वा.च्या सुमारास नंदीध्वज आगमनामुळे आनंदाने खुलले पंचरंगी ध्वजासह सातही मानाच्या नंदीध्वजांचे आगमन झाल्यानंतर डोळे मिटून हात जोडून सर्वांनी नमन केले. पारंपरिक वाद्यांसह ढोलच्या दणदणाटाने वातावरणात अधिकच उत्साह संचारला होता. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या भाविकांची लाट संमती कट्ट्याच्या दिशेने येत होती. डौलाने संमती कट्ट्याकडे येणाऱ्या नंदीध्वजांना स्मार्ट फोनमधील कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी भाविकांची धडपड सुरू होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी मुख्य मार्ग बंद केला होता. आबालवृद्धांच्या मुखातील एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चा जप करण्यात आला.
नंदीध्वजांच्या आगमनानंतर हिरेहब्बू श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या पूजेसाठी मंदिरात गेले. सकाळपासूनच वेदमुर्ती बसवराज शास्त्रींनी कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेतून खुमासदार शैलीत निवेदन करून सर्वांनाच खिळवून ठेवले होते. तोवर संमती कट्ट्यावर विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती सम्मती कट्याजवळ गंगापूजन व सुगडी पूजन झाले मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचे हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन केले यावेळी मानकरी म्हेत्रे – कुंभार उपस्थित होते.

यात्रिक निवास येथे संमती पूजन झाले सुहास शेटे यांना राजशेखर देशमुख यांनी संमती पाने दिली.संमती कटयावर गेल्यावर सिध्देश्वर देवस्थान समितीच्या वतीने हिरेहब्बू, देशमुख व इतर मान्यवरांना पुष्प हार घालून स्वागत केले. सुहास शेटे यांनी संमती वाचन सुरू केले. दुपारी एक वाजून ४६ मिनिटानी सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डम….! म्हणताच भाविकांनी चारही दिशातून अक्षताचा वर्षाव केला आणि अखेर सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपारिक अक्षता सोहळा भक्ती भावात पार पडला श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा झाला.
दरम्यान, अक्षता सोहळा झाल्यानंतर पुनश्चः एकदा ६८ लिंगांना प्रदक्षिणा करण्यासाठी नंदीध्वज मार्गस्थ झाले
अक्षता सोहळ्याला काशीपिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी,पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे,मानकरी आ.विजयकुमार देशमुख, आ. प्रणिती शिंदे, आ.सुभाष देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ. रोहित पवार, माजी आमदार दिलीप माने,अक्कलकोटचे मालोजी राजे भोसले, माजी आ.विश्वनाथ चाकोते, माजी आ.सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. लक्ष्मण ढोबळे,पोलिस आयुक्त राजेंद्र माने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे,सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे,सोमपा नगर अभियंता सारिका अकुलवार, सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी,सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी, विश्‍वस्त ऍड. मिलिंद थोबडे , राजशेखर शिवदारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे, प्रा.शिवाजी सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर महेश कोठे,माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, अमोल शिंदे, गणेश पुजारी, शहाजी पवार, सुरेश हसापुरे, भारत जाधव, अमर पाटील, मनिष देशमुख , माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्यासह राजकीय नेत्यांची उपस्थिती होती.

🟫🟫🟫
“संस्कारभारती” ची तीन किलोमीटर मनमोहक रंगावली

अक्षता सोहळयाच्या दिवशी नंदीध्वजांच्या मिरवणूक मार्गावर “संस्कारभारती” चे सुमारे ४५० ते ५०० रंगावली कलाकारांनी आपली कला सादर केली. रांगोळीच्या पायघडया (पथरंगावली) घालण्यात आल्या होत्या चंद्रयान विजयी भवची थीम घेण्यात आली होती हिरेहब्बू मठापासून ते सिध्देश्वर मंदिरातील संमती कट्टा पर्यंत सुमारे तीन किलोमीटरच्या मार्गावर मनमोहक रंगावली घातली होती
🟫🟫🟫

“कर्मसाक्ष संस्थेने अत्तर लावून केले सेवेकऱ्यांचे स्वागत”

मकरसक्रांती व श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त तसेच अक्षता सोहळ्यासाठी येणाऱ्या नंदीध्वज धारकासह भाविक भक्तांचे स्वागत हे सोलापुरातील कर्मसाक्ष बहुद्देशीय सामजिक संस्थेच्या वतीने सुगंधी अत्तर लावून करण्यात येत होते कर्मसाक्ष बहुद्देशीय सामजिक संस्थेच्या सचिवा सौश्वेता लक्ष्मीकांत व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांना सुगंधी अत्तर लावून पुढील सर्व सेवेकरी आणि भक्तगणांना अत्तर लावण्यात आले कर्मसाक्ष संस्थेचे हे तिसरे वर्ष असून या सेवेकरिता विलास अरळी, श्वेता व्हनमाने, गौरव खंदारे, प्रफुल्ल हिट्टनळी, श्रीकांत जोगदंड, हेमलता म्हेत्रे, अफ्रीन बागवान, सावरणी व्हनमाने, हर्षदा व्हनमाने आदी सदस्यांनी सेवा बजावली.

One thought on “ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळा भक्तिभावाने संपन्न…

  1. आपल्या ताज्या बातम्या मुळे आम्ही व्यवस्थित समाज जागृती आणि घडामोडी कळतात. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *