सहा दशकांतील काँग्रेसकाळाच्या समस्या मोदी सरकारने दहा वर्षांत संपविल्या

भाजपचा पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीचा –
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

मेट्रो सोलापूर √ समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, सत्तर वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना मोफत उपचार, तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण, युवकांचा कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती, गरीबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्षे मोफत धान्य, प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणी, एक कोटी घरांना अनुदान सौरवीज, विनातारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगांस प्रोत्साहन, शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अर्थसाह्य अशा विविध योजनांतून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारखा आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गँरंटी आहे, असा दावा प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
प्रवक्ते उपाध्ये म्हणाले, सुमारे सहा दशके देशावर सत्ता गाजवूनही काँग्रेसने देशातील गरीबी हटविली नाही उलट दारिद्र्यरेषा गडद होत गेली. तरुणांना रोजगाराच्याच नव्हे, तर शिक्षणाच्या संधीदेखील नाकारल्या गेल्या, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची उपेक्षा केली, महिलांच्या उत्कर्षाच्या संधी नाकारल्या, आणि उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून देश गरीब व मागासलेला राहील याचीच दक्षता घेत जगासमोर हात पसरण्याचे धोरण पत्करून जनतेलाही दुर्बल मानसिकतेत ठेवले. याउलट गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकेंद्री नेतृत्वामुळे, काँग्रेसने निर्माण केलेली प्रत्येक समस्या सोडवून देशाला समृद्धीचा मार्ग सापडला असून २०४७ पर्यंत जगातील सर्वात समृद्ध देश म्हणून भारत ताठ मानेने जगाचे नेतृत्व करेल असा विश्वास मोदी यांनी दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे संकल्पपत्र म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षांचे प्रतिबिंब असून प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणे हा आपला संकल्प असल्याची पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे असेही उपाध्ये म्हणाले.

या संकल्पपत्रातील प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकदीने अथक परिश्रम करणार असून समाजातील शेवटच्या स्तरावरील व्यक्तीपर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याचा पक्षाचा निर्धार आहे,महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब या चारच जाती देशात आहेत, असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मानतात या समाजघटकांना अधिक सक्षम करून देशाला समृद्ध करण्याची मोदी यांची गॅरंटी असल्याचे सांगितले. काँग्रेसचा जाहीरनामा हे अपयशाचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले काँग्रेसने याआधी जाहीरनाम्यातून दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही अशी टीकाही त्यांनी केली.

देशातील ८० कोटी लोकसंख्येला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून मोफत धान्य देण्याची योजना मोदी सरकारने २०२० मध्ये सुरू केली असून ही योजना पुढील पाच वर्षे सुरू ठेवण्याचा मोदी सरकारचा संकल्प असून, आयुष्मान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंतचे आरोग्य संरक्षण, ७० वर्षांवरील नागरिकांना मोफत उपचार, पीएम आवास योजनेतून तीन कोटी घरे,पीएम किसान कल्याण योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी वार्षिक सहा हजार रुपये देण्याची मोदी यांची गॅरंटी आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार यामध्ये सहा हजाराची भर टाकत असल्याने शेतकऱ्यांना बारा हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळत आहे, अशी माहिती उपाध्ये यांनी दिली.

पीएम पीकविमा योजना अधिक मजबूत करण्यात येणार असून गेल्या पाच वर्षांत प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. डाळी आणि खाद्यतेलात आत्मनिर्भरता आणण्याची मोदी यांची गॅरंटी आहे, तर भाजीपाल्यासारख्या नाशवंत पिकांचे उत्पादन वाढवून त्याच्या साठवणीकरिता स्वयंपूर्ण सुविधा उभ्या करून या पिकांना व उत्पादकांना आर्थिक सुरक्षितता देण्याचा मोदींचा संकल्प आहे.
श्री अन्नाकरिता जगभरातील बाजारपेठा उपलब्ध करून देऊन नैसर्गिक शैतीच्या विस्ताराच्या ठोस योजना आखण्यात आल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत मोदीसरकारच्या नियोजनातून सुमारे २५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. पुढच्या पाच वर्षांत सिंचनक्षेत्रात आणखी भर घालण्याच्या ठोस योजनाही तयार आहेत, असे ते म्हणाले. शेतजमिनीचा कस टिकविण्याकरिता कार्यक्रम हाती घेतला जात आहे. वातावरणातील बदलाचे परिणाम अभ्यासून पिकांना संरक्षण देण्याकरिता स्वतंत्र उपग्रह सोडण्यात येणार असून या क्षेत्रातील लहान शेतकऱ्यांकरिता पूर्णपणे उपलब्ध राहील अशा डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रेल्वे अपघात टाळणारी कवच यंत्रणा, वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत ट्रेनचा विकास व निर्मिती देशातच होणार असून सुमारे १३ हजारांहून अधिक रेल्वे स्थानकांचा जागतिक दर्जाचा विकास करण्याचे काम सुरू झाले आहे
आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाचे देशव्यापी कार्यक्रम राबविण्याचा मोदी यांचा संकल्प आहे. २०१९ मध्ये मोदी सरकारने दिलेल्या जाहीरनाम्यातील सर्व ७५ आश्वासने पूर्ण करण्यात आली आहेत.
या पत्रकार परिषदेस भाजपचे शहर सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, माजी सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, शहर प्रसिद्धी प्रमुख योगेश कबाडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *