वीरशैव व्हिजनतर्फे बसव व्याख्यानमाला

शनिवारपासून सलग तीन दिवस आयोजन

मेट्रो सोलापूर √ जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या दहाव्या वर्षीही वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यावर्षीचे पहिले पुष्प शनिवार दि. 4 रोजी प्रा. राजा माळगी (सांगली) हे ‘महात्मा बसवेश्वर काल आज आणि उद्या” या विषयावर गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, आडत व्यापारी सिद्रामप्पा हुलसुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

दुसरे पुष्प रविवार दि. 5 रोजी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉ. शिवरत्न शेटे (एम. डी. आयुर्वेद) हे ‘चला संस्कार जपू या’ या विषयावर गुंफणार आहेत. दुसऱ्या पुष्पाचे उ‌द्घाटन हृदयरोग तज्ञ डॉ. शैलेश पाटील यांच्या हस्ते, डॉ. प्रकाश घटोळे यांच्या अध्यक्षतेखाली तर डॉ. सिद्धेश्वर वाले, उद्योगपती राजशेखर मिनजगी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

                    व्याख्यानमालेचा समारोप सोमवार दि. 6 रोजी स्वानंद (मोहोळ) प्रस्तुत ‘संगीत रजनी’ या मराठी व हिंदी गाण्यांच्या सुरेल मैफिलीने होणार आहे. समारोपाच्या पुष्पाचे उद्घाटन उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे यांच्या हस्ते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली तर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ऍड. अमित आळंगे, सोलापूर जिल्हा मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय नवले यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

सदर व्याख्यानमाला डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह (A/C हॉल) येथे उपरोक्त तारखेला सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून दररोज 5 श्रोत्यांना सोडतीद्वारे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तरी सोलापूरवासीयांनी बसव व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी केले आहे. 

या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, राजेश नीला, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *