महापारेषणचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

 

 

    राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ थाटात

मेट्रो सोलापूर √ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा १९ वा वर्धापनदिन नुकताच मुंबई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजीव कुमार यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (स्वतंत्र) विश्वास पाठक, महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, संचालक (वित्त) अनुदीप दिघे, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित होते.
सुरूवातीला उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे म्हणाले, “कंपनीची संस्कृती व कर्मचाऱ्यांमध्ये एकसंघ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे, सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणे, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कंपनीचा विकास साधावा, या हेतूने महापारेषणतर्फे कंपनीचा १९ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा त्यामागचा हेतू आहे.
डॉ. संजीव कुमार म्हणाले, “महापारेषण ही देशात सर्वोत्तम पारेषण कंपनी आहे. महापारेषणने ड्रोनचा वापर सुरू केला आहे. हा ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्व्हेक्षण व देखरेख करण्यासाठी चांगला निर्णय ठरला आहे. महापारेषणच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपविभाग स्तरापासून सांघिक कार्यालय स्तरापर्यंत पुरस्कार योजना सुरू केली आहे. भविष्यातही अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना चालू राहील.“
ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम यावेळी सादर केले. जनसंपर्क विभागाच्या समन्वयातून महापारेषणच्या सर्वंकष कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या चित्रफितीने वातावरण ऊर्जामय झाले. प्रसिध्द गायक श्रीकांत नारायण व उत्तरा केळकर यांच्या गीतांनी कार्यक्रमाला बहार आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापारेषणचे मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) मंगेश शिंदे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन, मनुष्यबळ नियोजन) राजू गायकवाड, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, अधीक्षक अभियंता संजीवकुमार बद्देला, राजशिष्टाचार अधिकारी सतिश जाधव, संचालक (मानव संसाधन) यांचे विशेष कार्य अधिकारी तथा व्यवस्थापक (मानव संसाधन) महेश आंबेकर, रेणुका नाटके यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला राज्यातील विविध परिमंडळातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश आंबेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *