घरोघरी गौराईचे उत्साहात आगमन…!

सोलापूरातील उळागड्डे परिवार यांच्या घरी गौराईचे ( श्री महालक्ष्मी ) उत्साहात आगमन झाले.

सोलापूर : श्रीगणेशाच्या आगमनानंतर आज दुपारी घरोघरी परंपरेप्रमाणे सोलापूरातील महिलांनी गौरीचे थाटात आवाहन तथा आगमन साजरे केले गौरी आवाहनाच्या पहिल्या दिवशी अंगणातील तुळशीवृंदा पासून घरात गौराईचे आगमन होते.गौरींची पूजा – आरती करून विशेष ज्वारीची भाकरी व शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो सर्वांना धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य मिळो अशी प्रार्थना आगमनानंतर महिलांनी गौरीकडे केली.
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी ,धन ,धान्य,ऐश्वर्य, आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात.गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.पहिला दिवस गौरी आवाहनाचा असतो. माहेरवाशिणींना हा मान दिला जातो आपापल्या पद्धती आणि रूढीपरंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवून आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जातात. आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणले जाते गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत केले जाते. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवल्या जातात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना केली जाते अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधले जाते.


गौरी पूजन शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ रोजी असून या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करून दुपारी १२ वाजेपर्यंत गौरीला नैवेद्य दाखवले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *