विद्यार्थिनींनी ध्येयप्राप्ती करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवावा : मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे

सोलापूर √ हजारो वर्षे गुलामी आणि अज्ञानाच्या साखळदंडात बंदिस्त असलेल्या आणि पारतंत्र्याचे जीवन जगणाऱ्या स्त्रियांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कार्यातून शिक्षणाची दारे खुली करून स्त्रियांना माणूसपण प्राप्त करून दिले स्त्रियांना शैक्षणिक अवकाश उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षातून प्रेरणा घेऊन विद्यार्थींनींनी आपल्या अडीअडचणींचा सामना करावा. ध्येयप्राप्ती करताना त्यांच्या विचार आणि कार्याचा आदर्श समोर ठेवावा असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी केले सोलापुरातील सातरस्ता परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे होते. व्यासपीठावर प्रा. निलोफर तांबोळी यांची उपस्थिती होती. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना वाकडे म्हणाल्या की, विद्यार्थिनींनी स्वत:तल्या उणीवा आणि क्षमता ओळखून सातत्याने दीर्घकालीन प्रयत्न करायला हवेत आयुष्यात येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक, शारीरिक आणि भावनिक खंबीरता येण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करायला हवे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, महापुरुषांच्या विचार आणि कार्यातून प्रेरणा घेऊन परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करावी. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे उपलब्ध झालेल्या शैक्षणिक संधींचा उपयोग स्वतःचे आयुष्य उज्वल करण्यासाठी करावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रदीप जगताप यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. अरूणा कोडम यांनी केले तर आभार डॉ. इंदुमती चोळ्ळे यांनी मानले कार्यक्रमास प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ. मल्लिनाथ अंजुनगीकर, उपप्राचार्य प्रा.देवराव मुंडे महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *