स्व: अस्तित्वासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव हवी – उल्का पाटील

एलबीपीएम’ महाविद्यालयात ‘स्मार्ट गर्ल’ कार्यशाळा संपन्न

सोलापूर √ विद्यार्थिनींनी कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊन स्व: अस्तित्व आणि आत्मसन्मानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे स्वातंत्र्याचा अधिकार अमूल्य आहे,पण स्वातंत्र्यासोबतच येणाऱ्या सामाजिक जबाबदारीचे भान आणि जाणीवही असायला हवी असे प्रतिपादन रयत संकुलाच्या मार्गदर्शिका उद्योजिका उल्का पाटील यांनी केले.सोलापुरातील सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित ‘स्मार्ट गर्ल’ कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ उद्योजक केतनभाई शहा, स्मार्ट गर्ल्सच्या प्रकल्प अधिकारी मेघना देसाई, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, प्रशिक्षक दीपक पाटील, सुवर्णा कटारे, मयूर कर्जतकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाल्या की, स्वतःच्या शारीरिक, मानसिक क्षमता व मर्यादा ओळखून सकारात्मक बदल व सुधारणा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. महिलांची आत्मनिर्भरता व त्यांच्या विकासातच कुटुंब, समाज आणि पर्यायाने राष्ट्राचे विकास निहित आहे.
यावेळी मेघना देसाई यांनी ‘स्मार्ट गर्ल’ कार्यशाळेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुरेश ढेरे व सुत्रसंचलन डॉ. इंदुमती चोळळे यांनी केले तर आभार प्रा. किरण भोसले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *