नाटक संवादाचे सर्वोत्तम साधन – डॉ.जब्बार पटेल

विभागीय नाट्य संमेलनाचे सोलापुरात दिमाखात उद्घाटन

सोलापूर √ नाटक हे संवादाचे सर्वोत्तम साधन आहे त्यामुळे नाटकाच्या माध्यमातून माणसा- माणसातील, प्रांता – प्रांतातील, धर्मा- धर्मातील व जाती – जातीतील तसेच देशा – देशातील संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापुरातील शतक महोत्सवी अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाला शनिवारपासून सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावरील रंगकर्मी नामदेव वठारे रंगमंचावर प्रारंभ झाला या नाट्य संमेलनाचे उद्घाटन डॉ.जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे तसेच हुतात्म्यांचे सुद्धा शहर आहे या शहराने अनेक नाट्य कलावंत दिलेले आहेत नाट्य चळवळीची परंपरा असलेले सोलापूर याच शहरात होत असलेले विभागीय नाट्य संमेलन हे सोलापूरची शोभा वाढविणारे निश्चितच ठरेल,असा विश्वासही डॉ. पटेल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
नाटक आणि नाट्य चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्यात ठीकठिकाणी विभागीय नाट्य संमेलने घेण्यात येत आहेत. नाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्याचा हा यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्यात ठीकठिकाणी नाट्य सभागृह उभारण्यात येणार आहेत शिंदे सरकारने तसे आश्वासन सुद्धा दिले आहे. जिथे नाट्य सभागृह नाही, तिथे नवीन नाट्य सभागृह उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तर जिथे नाट्यगृहाची दुरावस्था आहे तेथे त्या नाट्यगृहाचे नूतनीकरण करून नाट्य चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न होणार असल्याचेही दामले यावेळी बोलताना म्हणाले.सोलापुरातील जुळे सोलापुरात सुद्धा नाट्य सभागृह होत असल्याबद्दल दामले यांनी समाधान व्यक्त केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सभागृहासाठी दहा कोटींचा निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोलापूरच्या नाट्य परंपरेची माहिती दिली. नाटक आणि कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरला १९७८ पासून नाट्य परंपरा आहे मराठीसह कन्नड, तेलगू,हिंदी आणि उर्दू भाषेतील नाटकांना प्राधान्य दिले आहे. सोलापूरने अनेक कलावंत दिले आहेत आजही ते नाट्य क्षेत्राची सेवा करत आहेत सोलापूरला शंभर ते दीडशे वर्षाची नाटकाची परंपरा आहे, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद आपणास देण्याचे ठरल्यानंतर आपण त्याला सुरुवातीला नकार दिला होता. परंतु नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आज निघालेली पारंपरिक दिंडी आणि त्यामध्ये सहभागी झालेले सर्व कलावंत यांचा उत्साह पाहता स्वागताध्यक्षपद हे खऱ्या अर्थाने सफल झाल्याचा आनंद होत असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी अध्यक्ष मोहन जोशी, सैराट फेम रिंकू राजगुरू, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाऊसाहेब भोईर, बी.पी.रोंगे,आमदार सुभाष देशमुख, कलावंत सविता मालपेकर, तेजश्री प्रधान, किशोर महाबोले, प्रकाश यलगुलवार, प्राध्यापक शिवाजी सावंत,दत्ता सुरवसे, प्रशांत बडवे, अविनाश महागावकर,सतिश लोटके, विजयकुमार साळुंखे, दिलीप कोरके,जितेश कुलकर्णी,पद्माकर कुलकर्णी यांच्यासह मराठी नाट्यसृष्टीतील कलावंत तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *