अंकुर साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण दुःखाला हुंकार द्यावयास शिकले पाहिजे – प्रा.राजेंद्र दास

सोलापूर √ प्रत्येकाचे जगणं हे लयदार असतं, प्रत्येकाच्या जगण्यात एक सौंदर्य असतं, एक दृष्टी असते,आपलं गाणं आपणच गायलं पाहिजे ज्याला दुःख कळते तोच खरा माणूस. म्हणूनच दुःखाला हुंकार द्यावयास आपण शिकलं पाहिजे. साहित्य हे अशा दुःखाचा एल्गार असतो. कवी लेखकांनी व्यक्त झालं पाहिजे अशी अपेक्षा प्रख्यात साहित्यिक प्रा. राजेंद्र दास यांनी व्यक्त केली.
अंकुर साहित्य संघ सोलापूरच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य व राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रा.दास बोलत होते यावेळी विचारपीठावर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे ,प्राचार्य नसीम पठाण अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष  भरतकुमार मोरे,जिल्हाध्यक्ष,नागनाथ गायकवाड,रमेश खाडे आदी उपस्थित होते
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आला. केंद्रीय उपाध्यक्ष भरतकुमार मोरे यांनी प्रास्ताविकात गेल्या पाच वर्षापासून अंकुर साहित्य संघाच्या वतीने राज्यभरातील साहित्य कलाकृतींचा गौरव करण्यात येत असल्याचे सांगून भविष्यात पुरस्काराची संख्या वाढविण्यात येत असल्याचे नमूद केले. नागनाथ गायकवाड यांनी परीक्षकांची भूमिका मांडली. यावेळी  कवी नागनाथ गायकवाड साहित्य गौरव पुरस्काराने  डॉ. सुनील श्रीराम पवार( बुलढाणा) यांच्या ‘सिजर न झालेल्या कविता’ तसेच रामदास कांबळे (लातूर )यांच्या’ प्रवर्तन गर्भाच्या कविता ‘तर कोंडीराम राघोजी बोराडे (औरंगाबाद)यांच्या ‘पांग’ तर डॉ.देविदास  तारू (नांदेड  )यांच्या ‘आता मव्ह  काय’ या आत्मचरित्रास तसेच दलित मित्र स्व.सौदागर मोरे स्मृती समाजभूषण गौरव पुरस्काराने अतिश कविता लक्ष्मण शिरसाठ तसेच आस्था रोटी बँक परिवाराचा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने दलित मित्र आप्पासाहेब जाधव गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला रोख रक्कम गौरव चिन्ह सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
स्वतःला शोधीत जाणं हे अतिशय अवघड काम आत्मकथनाच्या रूपाने केलं जातं असं सांगून मध्यंतरीच्या काळात आत्मचरित्र लिहून घेण्याचे पेव फुटले असल्याचे वास्तव प्रा. दास यांनी  सांगितले तर नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचं काम  त्यांना लिहितं , बोलतं व त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम अंकुर करत असल्याचा गौरवोद्गार प्रा. शिवाजीराव शिंदे यांनी काढले. यावेळी सर्वच पुरस्कार विजेतेने मनोगत व्यक्त केली. यावेळी झालेल्या कवी संमेलनात सोलापुरातील कवींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास अनिल पाटील, रमेश खाडे, राजेंद्र भोसले , विकास कस्तुरे, साधना घाडगे, पद्मिनी मोरे ,शैलेंद्र पाटील, रामप्रभू माने चंपावती जाधव, विजया देशपांडे ,अमोल मोरे, यांच्यासह शहरजिल्ह्यातील साहित्यिक कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत कोळी यांनी केले तर आभार दीपक मोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *