डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज  – उमाकांत मिटकर 

भीम प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे थाटात वितरण 

सोलापूर √ विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याची आज गरज आहे व तो वारसा सोलापूरातील भीम प्रतिष्ठानने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून जपला आहे. ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर (पुणे) यांनी काढले. 

         येथील भीम प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी सायंकाळी शिवस्मारक सभागृह येथे थाटात पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते प्राचार्य डॉ. अनिल बारबोले हे अध्यक्षस्थानी होते. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विचारमंचावर शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, डॉ. उदय वैद्य ,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, डॉ. शिवाजीराव पवार , विनोद माने, उद्योजक मयूर विसारिया, संतोष चौंडावार , प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे, अध्यक्ष वीरेंद्र हिंगमरे, सचिन गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

            न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. गेली 24 वर्षांत डॉ. आंबेडकरांच्या विचारावर भीम प्रतिष्ठानने वाटचाल केली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पुरस्कारामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते. सामाजिक कार्य करीत असताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते तरीही प्रतिष्ठानने आपले कार्य अखंडितपणे ठेवले आहे ते स्तुत्य आहे, असे ते म्हणाले.

       अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल बारबोले म्हणाले, तळागाळात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.अश्रूंची भिम प्रतिष्ठानने नाळ जोडली आहे, ज्यांना दुःख कळते तेच खरे संस्कारी. आज समाजात कोणी कोणाला सांगत नाही,ऐकत नाही, अशी परिस्थिती असताना प्रतिष्ठानने आपले कौतुकास्पद कार्य निरंतर चालू ठेवले आहे.

       सत्कारमूर्ती जिल्हा सरकारी वकील अॕड. प्रदीपसिंग राजपूत यांनी प्रातिनिधिक मनोगतात प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने गेल्या 24 वर्षापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वागत संस्थापक बाबा बाबरे यांनी केले. अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या 24 वर्षातील कार्याचा आढावा मांडला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. अॕड.विशाल मस्के यांनी आभार मानले यावेळी प्रतिष्ठानचे अमित बाबरे, सिद्धांत बाबरे, अकबर शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

⬛ या मान्यवरांचा झाला पुरस्काराने सन्मान ⬛

 

यावर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये विशेष गौरव पुरस्कार – जिल्हा सरकारी वकील अॕड. प्रदीपसिंग राजपूत, पत्रकारिता पुरस्कार – विक्रम खेलबुडे, गौरव पुरस्कार – सर्जेराव सावंत, शैक्षणिक सेवा पुरस्कार – शिवाजी व्हनकडे, सामाजिक पुरस्कार – जावेद नगारे, शैक्षणिक पुरस्कार – श्वेता विकास कस्तुरे ( एन.के.किड्स स्कूल ) क्रीडा पुरस्कार – मीनाक्षी रघुनाथ देशपांडे, मानपत्र – रामचंद्र वाघमारे, तेजस्वी रामचंद्र वडावराव , डॉ.शिवाजीराव पवार आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *