महाप्रितसोबत पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचा सौर उर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण सामंजस्य करार

 

मेट्रो सोलापूर √ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने हरित उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने महाप्रितसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आले,यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव श्रीमती योगिनी घारे, महाप्रितचे संचालक विजय काळम पाटील, संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य वित्त अधिकारी डि.सी. पाटील, मुख्य महाव्यवस्थापक सतीश चवरे, महाव्यवस्थापक विकास रोडे, महाव्यवस्थापक तेजस शिंदे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या सामंजस्य कराराचा उद्देश सौर उर्जा निर्मिती करुन विद्यापीठाला उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करणे हा आहे. विद्यापीठाशी संलग्न संस्थांना उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यास मदत होईल. उर्जा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रशिक्षण सुरु करणे आणि ग्रामीण भागातील युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे शक्य होईल. विद्यापीठातर्फे अनेक स्वयंरोजगाराचे उपक्रम राबविले जात असून या सौर उर्जा उपक्रमामुळे एक नाविन्यता निर्माण होईल.
विद्यापीठाचे कुलगुरु यांनी सौर उर्जा क्षेत्रात महाप्रितबरोबर केलेल्या कराराबाबत अनेक महत्वपूर्ण पैलू स्पष्ट केले. त्यांनी प्रतिपादन केले की “या सौर उर्जेमुळे विद्यापीठाची असणारी उर्जेची गरज कायमस्वरुपी भागविण्यासाठी मदत होणार असून आजूबाजूच्या परिसरातील उद्योग जसे की एन.टी.पी.सी. व अन्य आवश्यक असणारे कारखाने यांना सुध्दा अतिरीक्त सौर उर्जा पुरविणे शक्य होईल. दैनंदिन विद्युतसाठी विद्यापीठाला येणाऱ्या खर्चाची यातून बचत होणार आहे. विद्यापीठाची असणारी नापिक उपलब्ध जमीन याचा वापर विद्युत निर्मितीसाठी केला जाणार आहे. विद्यापीठ अपारंपारिक उर्जा उत्कृष्टता केंद्राचीदेखील उभारणी करणार आहे तसेच अपारंपारिक व उर्जा संवर्धन क्षेत्रात विविध तंत्रज्ञानाचे संशोधन व विकास देखील करणार आहे.”
महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अमोल शिंदे यांनी दृकश्राव्य पध्दतीने संबोधित करत असताना स्पष्ट केले की, “हा सामंजस्य करार महाप्रितच्या दृष्टीने एक अभिनव पाऊल असून महाप्रित वेळेच्या आत अभिनव तंत्रज्ञानाद्वारे हे काम पूर्ण करेल. महाप्रितकडे आजमितीस विविध तंत्रज्ञानाचे तज्ञ कार्यरत असून त्यांच्या अद्ययावत ज्ञानाआधारे सौर उर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण प्रकल्प राबविले जात आहेत. विद्यापीठाचा अपारंपारिक सौर उर्जा हा उपक्रम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नावलौकिक मिळवेल. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात जगमान्य असून तेथील औद्योगिक क्रांतीची सुरुवात विद्यापीठ व उद्योग क्षेत्रातील सामंजस्य करारातून झाली होती. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना / युवकांना फिल्ड ट्रेनिंगसाठी महाप्रितच्या विविध उपक्रमात, प्रकल्पात सहभागी होता येऊ शकेल ज्यामुळे या युवकांना आवश्यक तो अनुभव उपलब्ध होईल.”
महाप्रितचे संचालक विजय काळम पाटील यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले की, “ महाप्रित व विद्यापीठ संयुक्त पध्दतीने अनेक क्षेत्रात ज्यामध्ये प्रामुख्याने सौर उर्जा, कौशल्य विकास क्षेत्र, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, जलसंवर्धन व वातावरणीय बदल काम करु शकेल. यादृष्टीने प्रत्यक्ष पहिले पाऊल उचलण्यासाठी महाप्रितच्या तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक विद्यापीठातील प्रस्तावित ठिकाणांची पाहणी करुन पुढील कामकाजास सुरुवात करेल आवश्यकतेनुरुप इतर प्रकल्पांची सुरुवात करण्यात येईल”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *