कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त सोलापूरात भव्य अभिवादन मिरवणूक संपन्न

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे आयोजन

सोलापूर : आधुनिक महाराष्ट्राचे शैक्षणिक शिल्पकार रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त सोलापूरातील मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या वतीने भव्य अभिवादन मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी उद्योजिका उल्का पाटील यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, उपप्राचार्य प्रा. देवराव मुंडे डॉ आनंद शिंदे, डॉ. इंदुमती चोळळे, प्रा. निलोफर तांबोळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
शहरातील सात रस्ता, लष्कर, मौलाली चौक, सिद्धार्थ चौक, रिमांड होम, भगतसिंग मार्ग, महाराणा प्रताप चौक या मार्गावर कर्मवीर प्रतिमेची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. लेझीम पथक, ढोल पथक, झांज पथक व टिपरी पथकाद्वारे नृत्याचा सुंदर अविष्कार करत, कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या नावाच्या जयघोषात विद्यार्थिनींनी जनजागृतीपर संदेश देणारे फलक व बॅनर हातात घेऊन, उद्घोषणा देत ही मिरवणूक संपन्न झाली.

■ ■ ■
कर्मवीरांच्या जयंती औचित्याने महाविद्यालयात २२ ते २८ सप्टेंबर दरम्यान सप्ताह साजरा करण्यात येत आहे या सप्ताहात आरोग्य जनजागृती, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण निर्मूलन, महिला सक्षमीकरण, मतदानाचा हक्क, लेक वाचवा, स्त्री शिक्षण, वृक्षारोपण इत्यादी संदर्भातील पुस्तक परीक्षण, प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, कथा लेखन, कविता लेखन, मेहंदी, पोस्टर प्रदर्शन, रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *