योगदंड पूजनाने श्री सिध्देश्वर यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ

कुंभार वाड्यात दिवे लावण्याचा कार्यक्रम भक्ती भावात संपन्न

सोलापूर √ सोलापूरातील शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे पारंपरिक विधीवत पूजन गुरुवारी भक्तिमय व मंगलमय वातावरणात करण्यात आले शेटे वाड्याने गेल्या 900 वर्षापासून ही परंपरा मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने जोपासली असून येथील योगदंड पूजनाने श्री सिध्देश्वर महाराजांची यात्रेतील धार्मिक विधीला सुरुवात झाली.
यात्रेपूर्वी शेटेवाड्यात श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे विधिवत पूजन करण्याची परंपरा चालत आली आहे यावेळी शेटेवाडा हा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता परंपरेनुसार गुरुवारी दुपारी बारा वाजता मानकरी हिरेहब्बु यांच्या वाड्यातून शिवशंकर कंटीकर हे योगदंड घेऊन कै.शेटे यांच्या वाड्यात दाखल झाले त्या पाठोपाठ मानकरी हिरेहब्बु मंडळीचे आगमन झाले. त्यानंतर योगदंडाच्या विधिवत पुजेला सुरुवात झाली कै. शेटे यांचे वारस अॕड. मिलिंद थोबडे यांचे चिरंजीव अॕड रितेश थोबडे यांनी फुलांनी सजवलेल्या चौरंगावर योगदंड विराजमान करून विभूती, गंध, फुले, अर्पण करून संबळ वाद्याच्या निनादात व भक्तीमय वातावरणात त्यांनी योगदंडाची विधिवत पूजा केली.” बोला बोला एकदा भक्त लिंग हर्र बोला हर्र…श्री सिद्धेश्वर महाराज की जय ” असा जयघोष करण्यात आला त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आले.
नंदीध्वजाचे मानकरी सागर हिरेहब्बू ,मनोज हिरेहब्बू , अमित हब्बू, आकाश हब्बू, सिद्धेश हब्बु यांची ॲड. रितेश यांनी पाद्यपूजा केली व पूजनानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी विजया थोबडे, अँड. मिलिंद थोबडे, सुचिता थोबडे, ललिता थोबडे , श्रद्धा थोबडे, प्रणिता थोबडे, राजशेखर शिवदारे , सुधीर थोबडे, विक्रांत थोबडे, गीता थोबडे, प्रतीक थोबडे, संकेत थोबडे, सिध्देश थोबडे, राजश्री देसाई, उमेश अक्कलवाडे, प्रकाश वाले आदींनी योगदंडाचे मनोभावे दर्शन घेतले.

🟫 मानकरी कुंभार यांच्याकडून ५६ गडगी सुपूर्द 🟫

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या यात्रेतील धार्मिक विधीसाठी ( यण्णीमजन ) लागणाऱ्या मातीच्या ५६ गडगी (घागरी) ची मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात मिरवणूक काढून मानकरी कुंभार घराण्याने या घागरी यात्रेतील मानकरी हिरेहब्बूंकडे सुपुर्द केल्या.गुरूवारी, सकाळी साडेआठ वाजता उत्तर कसब्यातील कुंभार वाड्यात मल्लिकार्जुन म्हेत्रे – कुंभार यांच्या निवासस्थानी श्री गणपती आणि श्री सिध्दरामेश्वरांच्या प्रतिमेचे भक्तिभावनेने पूजन करून दिवे घालण्याचा कार्यक्रम झाला यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या ५६ घागरींची पूजाही करण्यात आली त्यानंतर तेथून सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *