मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत अंबिकानगर बाळे येथील जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात प्रथम…!

११ लाख रुपयाचे बक्षीस मिळणार

सोलापूर √ महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत स्थानिक स्वराज्य संस्था शाळा गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर बाळे तालुका उत्तर सोलापूर ही शाळा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग नोंदवला होता, त्यातून हे यश शाळेने मिळवले आहे. प्रथम क्रमांक आल्याने शाळेला ११ लाख रुपयाचे बक्षीस मिळणार आहे. जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर ही सोलापूर शहर हद्दवाढ भागातील शाळा असून काही वर्षांपूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीत ही शाळा चालू होती. त्यातूनही शाळा टिकवून येथील शिक्षकांनी परिश्रमपूर्वक व नियोजनबद्ध काम करून हे यश मिळवले आहे. मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळेत विविध प्रकारची कामे करण्यात आलेले आहेत. शाळा व वर्ग सजावट, बोलक्या भिंती, आरोग्य विषयक उपक्रम, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास, पालक व विद्यार्थी सहभाग, तंबाखूमुक्त शाळा, माजी विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती सहभाग, वृक्ष लागवड, विद्यार्थी मंत्रिमंडळ, परसबाग,बाल बचत बँक, महावाचन चळवळ, विविध कलाविषयक उपक्रम, स्वच्छता मॉनिटर, राष्ट्रीय एकात्मता विषयक उपक्रम, क्रीडा स्पर्धा असे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेने राबवले आहेत. शाळेत सीएसआर फंडातून प्रिसिजन कंपनीच्या माध्यमातून शाळा सुशोभीकरण, पेवर ब्लॉक बसवणे, फरशीकरण, पत्रे दुरुस्ती इत्यादी कामे प्रिसिजन कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बालाजी अमाईन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून स्वच्छतगृह उभारण्यात आले आहे प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून सोलर पॅनल व डिजिटल क्लासरूम उभारण्यात आले आहेत. विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत, विद्यार्थ्यांमध्ये अभिजात भारतीय संगीताची ओळख व्हावी यासाठी बैठक एट स्कूल हा संगीत विषयक उपक्रम सुरू आहे. त्यातून विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त गायन, वादन, नृत्यकला याविषयी माहिती दिली जाते. पासवर्ड वाचन अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लावण्यासाठी उपक्रम सुरू आहे. गीलो ऑन गो उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नाट्य अभिनयाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याचबरोबर अविष्कार कार्यशाळा, प्रयोगातून विज्ञान, ई लर्निंग डिजिटल क्लासरूम, लेखन साहित्य व स्कूल बॅग वाटप, अभिनव डेस्क किट वाटप, अभ्यास मित्र उपक्रम, शैक्षणिक साहित्याचा भरपूर वापर, हरित शाळा उपक्रम आदी नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून शाळेने उठावदार कार्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेच्या निकषानुसार घेतलेल्या विविध उपक्रम व शाळेने केलेली अंमलबजावणी याची दखल घेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शाळेला जाहीर झाले आहे.या यशासाठी मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे, शाळेतील शिक्षक श्रीमती रंजना काटकर, वैशाली गोंदकर, तेजश्री ढगारे, शिवशंकर राठोड, रसिका बंदीछोडे व शिवाजी वडते यांनी परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. लक्ष्मी कनकधर, उपाध्यक्ष सौ. कल्पना आडगळे व सर्व सदस्य यांनी यासाठी सहकार्य केले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी, गटविकास अधिकारी महेश पाटील, प्राथमिकचेशिक्षणाधिकारी कादर शेख व उपशिक्षणाधिकारी संजय जावीर व शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *