कोळी महासंघ देणार महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा   

कोळी महासंघ देणार महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा 

पदाधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याची शपथ

 

सोलापूर √ लोणावळा येथे आयोजित केलेल्या कोळी महासंघाच्या चिंतन शिबिरामध्ये राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांचे नेतृत्वामध्ये महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची शपथ घेतली.

या चिंतन शिबिराला मार्गदर्शन करताना कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील यांनी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपला देश “सबका साथ, सबका विकास” या ब्रीदवाक्यानुसार विकासाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगून मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जगात आपल्या देशाला मोठा सन्मान मिळत असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे आपल्या कोळी समाजाचा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा तसेच रक्त नातेसंबंधातील वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लवकरच सुटणार असल्याचे सांगितले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व तिसऱ्यांदा त्यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी कोळी समाजाने महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.

 शिबिरामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच लोकसभा निवडणूक २०२४ साठी कोळी महासंघाची दिशा काय असावी या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांनी प्रास्ताविक करताना उपस्थित सर्व पदाधिकारी व समाज बांधवांचे स्वागत केले. सहसचिव सतीश धडे यांनी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोळी महासंघाने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या उत्कर्षासाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा सर्व पदाधिकाऱ्यांसमोर मांडला.

याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, उपनेते देवानंद भोईर, उपाध्यक्ष साईनाथ अभंगराव, उपाध्यक्ष विठ्ठल इरले, नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ पापरकर, उपाध्यक्ष शिवशंकर फुले, ॲक्शन कमिटी प्रमुख चंद्रकांत घोडके, महिला उपाध्यक्ष रुक्मिणीताई अंबिगर, अरुण लोणारी, पहाडसिंग सुरडकर, अभय पाटील, शंकर मनाळकर, बाबासाहेब सैंदाणे, मुकेश सोनवणे, सुभाष कोळी, काशिनाथ दांडगे तसेच महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *