सोलापूर लोकसभा काॅंग्रेससाठी ठरणार आव्हानात्मक… दीड लाखाचे मताधिक्य तोडण्याचे आव्हान…

सोलापूर √ सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार राम सातपुते आणि काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या दोन युवा आमदारांमध्ये लढत होत आहे काँग्रेसकडून स्थानिक विरुद्ध परका असा प्रचार केला जात आहे. काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ही निवडणूक प्रणिती ताई शिंदे यांच्यासाठी सोपी वाटत आहे मात्र वास्तवता तशी नाही असे एकंदरीत मागील काळातील लेखाजोखा वरून स्पष्ट होते.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मागील काळातील लेखाजोखा पाहिल्यास, कॉंग्रेसला भाजपाचं दिड लाखाचं मताधिक्य तोडून विजय मिळविणं, म्हणजेचं कठीण अशा अग्निपरीक्षेला सामोरं जाण्यासारखचं आहे. दोन युवा आमदारामध्ये होणाऱ्या या निवडणुकीचे वेध सोलापूरकरांना लागले असून, भाजपा सोलापूर लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून या मतदारसंघात हॅटट्रिक साधणार ? की भाजपाचा विजयाचा वारु रोखून कॉंग्रेस आपला जुना बालेकिल्ला ताब्यात घेण्यात यशस्वी ठरणार ? याकडं सर्वांचचं लक्ष लागून राहिले आहे.
सन 2014 आणि 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात घवघवीत यश संपादन करुन कॉंग्रेसला पराभवाचा चांगलाचं दणका दिला होता. ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनदा पराभूत करुन दाखवण्याची किमया भाजपाने या मतदारसंघात करुन दाखवली. सन 2014 साली भाजपाकडून शरद बनसोडे यांनी तब्बल 5 लाख, 17 हजार, 879 मतं मिळवली तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख, 68 हजार 205 मतं मिळाली. पुढं सन 2019 च्या निवडणुकीत ही भाजपाकडून डॉक्टर जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी 5 लाख, 24 हजार, 985 मतं मिळवली तर सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख, 66 हजार, 377 मतं मिळाली.
सन 2014 मध्ये भाजपाचं मताधिक्य हे 1 लाख, 49 हजार, 674 इतकं होतं, तर सन 2019 मध्ये ते 1 लाख, 58 हजार, 608 इतकं होतं. म्हणजे या मताधिक्यात 8 हजारांहून अधिक मताधिक्याची वाढ झाली. सन 2019 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं देखील चांगलीचं कामगिरी केली. स्वतः प्रकाश आंबेडकर हे मैदानात उतरले. या ठिकाणी ते स्वतः निवडणूक लढवताहेत, म्हटल्यावर विविध पक्षात कार्यरत असलेले आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता त्यांच्यासाठी एकत्रित आली. त्यांनी मोठ्या प्रमाणात एकी दाखवून काम केल्यानने प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल 1 लाख, 70 हजार, 7 मतं मिळवली. वंचितमुळं मतं विभागणी झाली, याचा फटका कॉंग्रेसला बसला आणि भाजपाला याचा थेट फायदा झाला असं कॉंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधून सातत्यानं सांगितलं गेलं आणि आमचा विजय निश्चित होता असा दावाही केला गेला. पण ही सर्व अर्थात 1 लाख, 70 हजार मतं ही कॉंग्रेसचीचं होती, असं कॉंग्रेसचे पदाधिकारी छातीठोकपणे सांगू शकत नाहीत. अर्थात ही वंचितसह इतरपक्षीय मतं देखील होती, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही . आंबेडकरी जनतेसह, आंबेडकरी चळवळीतील सर्वचं पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आल्यानं आणि त्यांनी, ते ज्या पक्षात कार्यरत होते, प्रसंगी त्या पक्षाच्या विचारांना बाजुला ठेऊन केवळ प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मतदान केले होते. त्यामुळं वंचितमुळं कॉंग्रेसला फटका बसला हे म्हणणं तितकं योग्य आणि समर्पक होणार नाही, किंवा ती मत सगळीचं काँग्रेसचीचं होती अस ही ठामपणे म्हणता येणार नाही, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीकडं बोट दाखवून कॉंग्रेस नामानिराळं होऊ शकतं नाही किंवा कॉंग्रेसच्या पराभवाची ही कारणमिमांसा होऊ शकत नाही.

सध्या काँग्रेस कडून परका आणि स्थानिक उमेदवार असा प्रचार केला जात असला तरी आमदार प्रणिती शिंदे सुमारे दीड लाखांचे मात्र तोडणार कुठून हा प्रश्न मात्र सर्वांना पडला आहे. गत दोन निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादीची मोठी मदत कॉंग्रेसला झाली होती. आता मात्र स्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी दुभंगली गेल्यानं महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीचा किती फायदा काँग्रेसला होणार? अथवा त्यांची किती ताकद या मतदारसंघात उरली आहे? हे ही पाहणं महत्त्वाचं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जी ताकदं आहे, अथवा त्यांना मानणारा वर्ग जो सोलापूर जिल्ह्यात, त्यातल्या त्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे, त्यांच्याकडं अथवा त्या ताकदीकडं कॉंग्रेसला दुर्लक्षून चालणार नाही. खासकरून मोहोळ मतदार संघ हा महत्त्वाचा ठरणार आहे.
विशेषतः कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार जर वंचितमुळं कॉंग्रेसचं नुकसान झालं असं गृहीत धरलं तरी आताच्या घडीला ही मतं पुन्हा कॉंग्रेसकडं आणायची म्हटलं तर ते तितकं साधं आणि सोप निश्चितचं नाही. मागील वेळी ज्यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आग्रही भूमिका घेतली, पुढाकार घेतला, ज्यांनी एकत्रित मतांची वज्रमूठ आवळली, ते नेते, पदाधिकारी आता कुठं आहेत याचा विचार होणं किंवा ते पाहणं ही गरजेचं आहे.
स्वतः प्रकाश आंबेडकर आता पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभारले तरी, त्यांना मागील निवडणुकीत मिळाली तेवढी मतं मिळतीलचं असं ठामपणे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीसला सुध्दा या मतदारसंघात पुर्वीसारखं वातावरणं अथवा स्थिथी राहिलचं हे सांगता येणार नाही.
यासर्व गोष्टींचा विचार करता, आणि एकूणचं राजकीय स्थिती, पाहता कॉंग्रेसला आणि अर्थातच मित्र पक्षांना या लोकसभा निवडणुकीत अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार हे निश्चित आहे.
भाजपानं आपली आहे ती मतं कायम राखली तर मग त्यांना, ही निवडणूक आव्हानात्मक राहणार नाही. भाजपानं मागील दोन निवडणुकीप्रमाणं जर 5 लाखांपुढं मत मिळवली, तर मग ते सलग तिसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळून हॅटट्रिक करु शकतात, असा
तर्क लावला जात आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेची निवडणूक काँगेससाठी चॅलेंजींग राहणार आहे. कॉंग्रेस आणि मित्रपक्षाला संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी लोकसभेच्या या रणसंग्रामात उतरण्याची तयारी करावी लागणार असून, दिड लाखांच्या मताधिक्याचं शिवधनुष्य ते कशा पद्धतीनं पेलणार हे पाहणं सध्या अत्यंत महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे, एवढं मात्र नक्की आहे.
चौकट
गत चार निवडणुकीत काँग्रेस चार लाखांच्या आतच कॉंग्रेसच्या सन 2014 पूर्वीच्या अर्थात सन 2009 आणि 2004 च्या निवडणुकीतील मतांकडे नजर टाकली तर बरचं काही स्पष्ट होते. सन 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 3 लाख, 87 हजार, 591 इतकी मत मिळाली होती, तर सन 2004 च्या निवडणुकीत 3 लाख, 10 हजार, 390 इतकी मतं मिळाली होती. याचा अर्थ गत चार निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेली मतं ही साडेतीन ते पावणेचार लाखांच्या आसपासचं राहिली आहेत. त्यांनी चार लाखांचा टप्पा हा गत चार निवडणुकीत ओलांडलाचं नाही.

⬜⬛⬜⬛
गट दोन निवडणुकीत भाजपला पाच लाखांपेक्षा जास्त मते
भाजपानं सन 2014 आणि सन 2019 च्या निवडणुकीत 5 लाख मतांचा टप्पा ओलांडला.2014 साली भाजपाकडून शरद बनसोडे यांनी तब्बल 5 लाख, 17 हजार, 879 मतं मिळवली तर 2019 मध्ये डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी 5 लाख, 24 हजार, 985 मतं मिळवली आहेत.गत दोन निवडणुकीत भाजपानं सुमारे दिड लाखाचं आपलं मताधिक्य टिकवून ठेवलं. या सर्व पार्श्वभुमीवर सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस समोर, भाजपाला पराभूत करण्याचं मोठ आव्हान राहणार हे उघड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *