केंद्रीय अर्थसंकल्पातील भरघोस मदतीमुळे महाराष्ट्राचा विकासात्मक वेग वाढला – केशव उपाध्ये 

प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा विश्वास

मेट्रो सोलापूर – केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या एक कलमी कार्यक्रमातूनच केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी गैरसमज पसरविण्याचा विरोधकांचा डाव असला तरी जनतेने आणि अर्थक्षेत्राने या अर्थसंकल्पाचे भरघोस स्वागत केले असून महाराष्ट्राला भरघोस निधी देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प गतिमान होणार आहे, असा विश्वास प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच न लागल्यामुळे विरोधकांनी सुरू केलेल्या गदारोळास अर्थमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी चोख उत्तर दिले आहे, असेही ते म्हणाले.

अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक विरोधकांनी नक्की वाचावे असा खोचक सल्ला उपाध्ये यांनी विरोधकांना दिला. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मागणी केल्यास या पुस्तकाच्या प्रती त्यांना मोफत वितरित करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 

या अर्थसंकल्पात महाराष्ट्राकरिता असलेल्या विविध प्रस्ताव आणि निधी वितरणाबाबत माहिती देताना उपाध्ये म्हणाले, देशातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या आणि जगातील अत्यंत महत्वाच्या बंदरांमध्ये एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदराच्या उभारणीकरिता अर्थसंकल्पात करण्यात आलेली ७६ हजार कोटींची तरतूद ही महाराष्ट्राला मोठी देणगी आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरसाठी ४९९ कोटी, तर बंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी ४६६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूरची जीवनवाहिनी असलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली असून देशभरात उभारल्या जाणाऱ्या १२ इंडस्ट्रियल पार्क प्रकल्पांमध्ये राज्यातील दिघी येथे उभ्या राहणाऱ्या इंडस्ट्रिअल पार्कचाही समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी आवर्जून दिली.

मुंबई, पुणे येथील मेट्रो प्रकल्पांकरिता २५८४ कोटींची तरतूद करण्यात आली असून मुंबई मेट्रो प्रकल्पाकरिता एक हजार ८७ कोटी, नागपूर मेट्रोकरिता ६८३ कोटी तर पुणे मेट्रोकरिता ८१४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मुंबईच्या विकासात महत्वाचा ठरलेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पाकरिता ९०८ कोटींच्या निधीमुळे उपनगरी रेल्वेसेवेचा दर्जा अधिक उंचावेल, तर महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. रेल्वे विकासाच्या महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली आहे, असा विश्वासही उपाध्ये यांनी व्यक्त केला.  

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळणे हे इंडी आघाडीची असहाय्यता असल्याने केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करणे त्यांना भाग आहे, अशी खोचट टिप्पणी करून, विरोधकांनी आता तरी अर्थसंकल्प समजून घेतला असेल तर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेस माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, विशाल गायकवाड, डॉ. नारायण बनसोडे, शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *