आरोग्यसेवेला संशोधनाची जोड दिल्याने कैकपटीने यश – डॉ. अभय बंग

‘प्रिसिजन गप्पा’ च्या पहिल्या दिवशी दोन संस्थांना पुरस्कार प्रदान

सोलापूर : समाज परिवर्तनासाठी केवळ सेवा, संघर्ष, शिक्षण हे तीनच घटक पुरेसे नाहीत हे जाणून आरोग्यसेवेला संशोधनाची जोड दिल्याने आम्हाला कैकपटीने यश मिळाले, असे प्रतिपादन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले. प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित १५ व्या ‘प्रिसिजन गप्पा’ कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झाले.
उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, विद्यार्थी विकास योजना प्रकल्पाचे प्रमुख रविंद्र कर्वे,विज्ञान आश्रम संस्थेचे डॉ. योगेश कुलकर्णी, प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन उद्योग समूहाचे संचालक करण शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका मयूरा शहा उपस्थित होते.
‘प्रिसिजन गप्पा’ च्या पहिल्या दिवशी प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या हस्ते यंदाचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सेवा सहयोग फाउंडेशनच्या विद्यार्थी विकास योजना प्रकल्पाचे प्रमुख रविंद्र कर्वे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तर स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार विज्ञान आश्रम, पाबळ (जि. पुणे) या संस्थेला देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि दोन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेच्यावतीने डॉ. योगेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यानंतर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची ‘सेवाग्राम ते शोधग्राम’ या विषयावरील प्रकट मुलाखत विवेक सावंत आणि मुक्ता पुणतांबेकर यांनी घेतली. डॉ. बंग म्हणाले, महात्मा गांधींच्या कार्याचा प्रभाव असलेला समाज आणि आचार्य विनोबा भावे यांचा प्रत्यक्ष सहवास यातून संस्कार आणि शिक्षण लहानपणापासूनच मला मिळत गेले. भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे सोबत फिरल्याने गरिबांशी नाते जोडायचे असेल तर ती गरिबी अनुभवावी लागते याचे ज्ञान मिळाले. मी आणि माझा भाऊ अशोक यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेऊन जणू नियतीशी करारच केला. जीवन आणि शिक्षण हे वेगळे नसून जीवन हेच शिक्षण आहे ही आचार्य विनोबा भावे यांची भूमिका सोबत घेऊन आजवर कार्य केले.
भारताचे आरोग्य खेड्यात हरवले आहे पण आपण ते शहरात शोधतो त्यामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. खेड्यांमधील समस्या सोडविण्याच्या प्रयत्नांना संशोधनाची जोड मिळाली तर मोठे परिवर्तन होऊ शकते. आम्ही केलेल्या छोट्या संशोधनामुळे राज्यातील तब्बल ६० लाख मजुरांची रोजगार हमी योजनेची मजुरी प्रतिदिन ४ रुपयांवरून १२ रुपये झाली याची आठवणही डॉ. बंग यांनी याप्रसंगी सांगितली.

■■■
‘प्रिसिजन गप्पा’ मध्ये रंगणार दिलखुलास गप्पा

प्रिसिजन गप्पा’ मध्ये ४ नोव्हेंबर शनिवारी “बाईपण भारी देवा” या चित्रपटातील कलाकार रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, चित्रपटाचे दिगदर्शक केदार शिंदे आणि निखिल साने यांच्या सोबतच्या दिलखुलास गप्पा आणि या चित्रपटाच्या पडद्यामागील कहाणी मुलाखतीच्या माध्यमातून सोलापूरकरांना ऐकायला मिळणार आहे. प्रसिद्ध सूत्रसंचालक अभिनेत्री डॉ. समीरा गुजर- जोशी या सर्वांची मुलाखत घेणार आहेत यावेळी सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *