शिवदारे अण्णांचे जीवनकार्य अविस्मरणीय : शिंदे

सिद्धेश्वर बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ सोहळा थाटात

सोलापूर : सहकारमहर्षी वि.गु. शिवदारे अण्णांचे जीवनकार्य अविस्मरणीय आहे त्यांची त्याग अन् समर्पक वृत्ती थोर होती 1974 ला मी जेव्हा मंत्री झालो तो क्लेम खरं तर शिवदारे अण्णांचा होता. परंतु आयुष्यात त्यांनी कधी ते बोलून दाखविले नाही. सहकार, राजकारण, शिक्षण, समाजकारणात अण्णांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
सोलापूर सिद्वेश्वर सहकारी बँक लि.सोलापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये गुरुवारी (दि.16) सकाळी हा सोहळा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.मुंबईचे अध्यक्ष – प्रशासक विद्याधर अनास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. प्रणिती शिंदे, आ. राजेंद्र राऊत, माजी आ. दिलीप सोपल, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. विश्वनाथ चाकोते, बँकेचे मार्गदर्शक तथा सोहळ्याचे स्वागताध्यक्ष राजशेखर शिवदारे, बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभिरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सिद्धेश्वर बँकेची 50 वर्षांची वाटचाल सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. शिवदारे अण्णांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा राजशेखर शिवदारे हे दिमतीने पुढे नेत आहेत. बँकेची भविष्यात आणखी गरुडझेप पहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रास्ताविकात बँकेचे चेअरमन प्रकाश वाले यांनी बँकेच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन बँकेचे सरव्यवस्थापक राम शर्मा यांनी केले.
स्वागतपर मनोगतात राजशेखर शिवदारे यांनी सहकार क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. विश्वासाहर्ता आणि सभासद हिताच्या जोरावर सहकारात भरारी घेता येते. ‘आरबीआय’ने सहकारी बँकांवरील जाचक नियमावलीचा योग्य वापर केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले यानंतर आ. विजयकुमार देशमुख, आ. राजेंद्र राऊत, माजी आ. दिलीप सोपल, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन शोभा बोल्ली यांनी केले. बँकेचे व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभिरे यांनी आभार मानले यावेळी बँकेचे संचालक मंडळ सदस्य, सुवर्ण महोत्सव समितीचे सदस्य, बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘रिपेमेंट कल्चर’ निर्माण करण्याची गरज
यावेळी बोलाताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष- प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले की, सहकारात राजकारण असू नये पण राजकारणात सहकार असावा. स्वत:बरोबरच सहकाराचं अस्तित्व टिकविण्याची जबाबदारी सहकारी बँकांची आहे. जरुरीपुरता नफा आणि सभासदाचे अधिक हित हे सहकारी बँकाचे तत्व आहे. आजच्या काळात बँकांनी ठेवीदार आणि सभासदांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे सहकार समजून घेण्याची ताकत सर्व संस्था, पदाधिकाऱ्यांमध्ये असावी प्रायव्हेट बँकाप्रमाणे कर्जदारांसाठी सहकारी बँकांनी ‘रिपेमेंट कल्चर’ निर्माण करण्याची गरज आहे त्यामुळे कर्ज वसुली शंभर टक्के होईल. प्रशिक्षित स्टाफ असल्यास सायबर क्राईमचा धोका टळेल असे त्यांनी सांगितले. सिद्धेश्वर बँकेची यशस्वी वाटचाल गौरवास्पद असल्याचेही ते म्हणाले.

■■■ सिद्धसुवर्ण संचय ठेव योजना

सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेने ‘सिद्धसुवर्ण संचय ठेव योजना’ सुरू केल्याची घोषणा चेअरमन प्रकाश वाले यांनी केली. 18 महिने कालावधीची ही योजना असून यात ठेवींवर 9 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे या योजनेसाठी 31 मार्च 2024 पर्यंत ठेवी स्वीकारणार असल्याचे वाले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *